साप
भारतात आढळणारे मण्यार, घोणस, नाग, फुरसं असे मोजके विषारी साप सोडले, तर बहुतांशी साप बिनविषारी आहेत. मात्र नेमक्या विषारी सापांच्या जाती मुंबई-ठाण्याच्या आसपास आढळतात. खासकरून पावसाळ्याच्या दिवसांत साप बाहेर येतात आणि खाडीकिनारी किंवा जंगल परिसरातील सोसायटय़ांच्या आवारात शिरतात. गेल्या आठ-दहा वर्षामध्ये साप मारू नयेत यासाठी सर्पमित्रांनी चांगलीच जनजागृती केली आहे. त्यामुळे दिसला साप की मार, ही मानसिकता बदलू लागली आहे. साप दिसताक्षणीच ओळखीतल्या सर्पमित्राला तात्काळ फोन जातात. सर्पमित्रही सामाजिक बांधीलकीच्या नात्यातून साप ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी धाव घेतो. परंतु त्यांच्या येण्यापूर्वी साप भलतीकडेच गेलेला असतो. मग सर्पमित्र आणि त्याला दूरध्वनी करणाऱ्या नागरिकाचे प्रयत्न निष्फळ ठरतात.
पक्षी
वाढत्या शहरीकरणामुळे मुंबईतल्या झाडांची संख्या रोडावली आहे. वड, पिंपळ, औदुंबर यांसारखी मजबूत झाडं कमी होऊन त्या ठिकाणी गुलमोहर-बदाम या झाडांसारख्या पोकळ झाडांची मांदियाळी दिसून येते. मात्र पक्ष्यांना राहण्यासाठी सुरक्षित जागाच नाही. सोसाटय़ाच्या वादळी वाऱ्यात, पावसात घरटी पडून पक्ष्यांची पिल्लं रस्त्यांवर आलेली दिसतात. कधी कधी वादळी पावसाच्या तडाख्यात सापडलेली घार वा घुबड असे मोठे पक्षी रस्त्यांवर किंवा इमारतीच्या आवारात जखमी अवस्थेत पडलेले आढळतात. या पक्ष्यांना पकडायला गेलो तर हे पक्षी चावतील या भीतीनं नागरिक घाबरून लांब पळतात. परंतु घाबरून न जाता त्यांच्या अंगावर कापड टाकून, त्यांना पकडून लहान लाकडी पेटीत किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवावं. तसेच पक्षीमित्रांच्या मदतीनं त्यांची रवानगी वनखात्याकडे करावी. काही वेळा लहान मुलं हौसेखातर त्यांना पाळायला नेतात. परंतु पाळण्यासाठी नेलेला पक्षी दुर्मीळ जातीतला असला, तरी त्याचं महत्त्व मुलांना समजत नाही. परिणामी त्याची योग्य देखभाल झाली नाही की तो मरतो.कासव
मुसळधार पाऊस पडल्यावर नदी-नाले भरून वाहतात. तेव्हा यातील अनेक जलजीव शहरातील गटाराच्या वाहत्या पाण्यात आढळतात. यात कासव प्रामुख्यानं दिसतं. तलावात मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात बरेचदा कासव मिळतं. ज्यांना कासवाचं महत्त्व माहिती आहे, ते त्याला लगेच पाण्याच्या प्रवाहात सोडून देतात. कासव घरात पाळणं वन्यप्राणी कायद्यानुसार चुकीचं आहे. मात्र फेंगशुईसारख्या अंधश्रद्धेमुळे किंवा घरात कासव ठेवणं भाग्याचं असतं, असं मानून वाहत्या गटारातून, काठोकाठ भरलेल्या विहिरीतून बाहेर आलेली कासवं पाळली जातात. चुकून असं मिळालेलं कासव घरात न ठेवता लगेचच वनखात्याकडे अथवा प्राणिमित्रांकडे सुपूर्द करावं. जेणेकरून त्यांना पुन्हा निसर्गाच्या प्रवाहात सोडता येईल.
No comments:
Post a Comment