Tuesday, April 20, 2010

द ग्रेट एस्केप


7 Jul 2009

पावसाच्या जबरदस्त दणक्याने उघड्यावर आलेल्या प्राणी-पक्ष्यांना सोडवण्याचं काम प्राणीप्रेमी संघटनांनी युद्धपातळीवर हाती घेतलंय.

वाट पाहायला लावून धुंवाधार बरसलेल्या पावसाने प्राण्यांचंही आयुष्य विस्कळीत केलं. अर्थात, याला पावसासोबत माणूसही जबाबदार आहे. पावसाने झाडांच्या फांद्या तुटू नयेत यासाठी त्या ट्रीम करताना, त्यावरची घरटीही खाली टाकणाऱ्या माणसांच्या बेफिकीर वृत्तीमुळे अनेक पक्ष्यांच्या पिलांना जीव गमावावे लागले आहेत, तर कित्येक पक्षी जखमी झाले आहेत. या पक्ष्यांना तसंच पाण्याने बिळं भरल्यानंतर बाहेर आलेल्या सापांना वाचवण्याचं काम प्राणीप्रेमी संघटना करत आहेत.

पावसाळ्याच्या सुरुवातीला पक्षी अंडी घालतात. पावसाळ्यात येणारं गवत तसंच किडामुंगीसारखं भरपूर खाद्य उपलब्ध होत असल्याने निसर्गाची ती योजना असते. मात्र, पिल्लं बाहेर येण्याचा काळ आणि पावसाने झोडपण्याचा काळ एकत्र आल्याने अनेक पिल्लांना जीव गमवावा लागतो. कोकीळ, खार, तित्तर आणि अशा अनेक पक्ष्यांची सुटका नुकतीच प्लॅण्ट््स अॅण्ड अॅनिमल वेल्फअर सोसायटीने (पॉज) केली आहे. यासोबत भाभा अॅटोमिक रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे बीएआरसी परिसर, भांडूप, मुलुंड या भागातून दहा सापांची सुटका करण्यात आली आहे. बिळात पाणी गेल्याने हे साप लपण्याची जागा शोधत परिसरात फिरत होते. यात चार नाग, चार घोणस आणि दोन धामण यांचा समावेश आहे. रसेल वायपर हे आशियातल्या सर्वात विषारी सापांपैकी आहेत. पवईच्या गोपाल शर्मा स्कूलमध्ये हे साप सापडले. कॉलेजमधली मुलं त्यांच्याशी खेळत होती. मात्र हे प्राणघातक होऊ शकलं असतं, असं 'पॉज'चे सेक्रेटरी सुनिश सुब्रमण्यम यांनी सांगितलं. याशिवाय भांडूप परिसरातून दोन सॉफ्ट शेल कासवांनाही सोडवण्यात आले आहे. आज पुन्हा 'बीएआरसी'मधून आणखी दोन सापांची सुटका करण्यात येणार आहे.

दिवाळीच्या फटाक्यांनी घेतला प्राण्यांचा बळी


19 Nov, 2007

फटाक्यांची आतषबाजी... रंगांची बरसात... आवाजांचा जल्लोष... अशा वातावरणाचा काही काळ सुखावणारा दिवाळी सण मात्र शहरातल्या प्राण्यांना जीवघेणा ठरला आहे. परिणामी, पशुवैद्यांकडे दिवाळीत दाखल झालेले बरेच प्राणी किमान दोन महिने ट्रीटमेण्टसाठी हॉस्पिटलमध्ये विश्रांती करणार आहेत.

गव्हाणी घुबडाच्या नुकत्याच जन्मलेल्या चार पिल्लांनाही फटाक्यांचा सामना करावा लागला. या चार पिल्लांबरोबरच त्यांची जन्मदातीही जबर जखमी झाली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची गेले काही दिवस 'सोसायटी फॉर प्रोटेक्शन ऑफ क्रुअॅलिटी टू अॅनिमल्स' काळजी घेत आहे. घारींनाही या फटाक्यांचा सामना करावा लागला होता. ५ ते ७ घारींचे पंख भाजल्याने त्यांनाही एसपीसीएमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

ठाणे-मुंबईत वन्यजिवांसाठी काम करणाऱ्या 'प्लाण्ट अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर सोसायटी' (पीऐडल्ब्यूएस) या पर्यावरणप्रेमी संस्थेलाही घुबडं, कबुतरं, चिमण्या, दयाळ असे पक्षी जखमी अवस्थेत मिळाले आहेत. याशिवाय दयाळ, कबुतरं, चिमण्या फटाक्याने मृत्युमुखी पडल्याचे संस्थेच्या सुनिश सुब्रमण्यम यांनी सांगितलं.

मुक्या जीवांना उन्हाळीचा चटका


28 Apr 2008

गेल्या आठवड्यापासून उन्हाचा पारा तेजीनं वाढतोय. १८ एप्रिलला या पा - यानं ३७ अंश सेल्सिअसवर पोहोचून हंगामाचा उच्चांक गाठला होता. या दिवसागणिक बदलांमुळे सर्वांच्याच अंगाची लाहीलाही होत असून त्याचा सर्वाधिक फटका मुक्या प्राण्यांनाही बसल्याचं चित्र सध्या मुंबई-ठाण्यात दिसू लागलंय. यामुळे प्राण्यांची हॉस्पिटलं तुडुंब भरल्याचं दृष्य असून हॉस्पिटलांत दाखल झालेल्या अनेक प्राण्यांना उन्हाचा तडाखा सहन न झाल्याने आपले प्राणही गमवावे लागल्याचं उघड झालंय.


गेल्या अठवड्यातल्या तापमानातील लाक्षणिक बदलांमुळे मुंबईच्या सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल्स (बॉम्बे एसपीसीए) या संस्थेकडे सुमारे ३० ते ४० पक्षी सध्या ट्रिटमेण्ट घेत असल्याचं संस्थेच्या जे सी खन्ना यांनी सांगितलं. यात आकाशात उंचच उंच घिरट्या घेणाऱ्या घारी, कबुतरं, पोपट, कावळे तसंच कोकीळ पक्षांचा समावेश आहे. याखेरीज, घोडे, गाई हेही दाखल झाल्याचं ते म्हणाले.

एसपीसीएच्या ठाणे शाखेतही दररोज सुमारे पाच ते दहा पक्षी दाखल होत असून यात पक्ष्यांचे पंख तुटणं, उंचावरून पडल्याने पक्षी जखमी होणं तसंच, इतर प्राण्यांच्या नाकातून रक्त येणं यासारख्या आजारांचं प्रमाण जास्त असल्याचं पशुवैद्यक डॉ. सुहास राणे म्हणाले.


भांडुपच्या प्लॅण्ट अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर सोसायटीकडे सुमारे ३० ते ४० पक्षी गेल्या आठवड्यात ट्रीटमेण्टसाठी आले होते, असं संस्थचे सुनिश सुब्रमण्यम यांनी सांगितलं. यात घारी, घुबडं, कबुतरं यांच प्रमाण जास्त आहे. संस्थेकडे कुत्र्यांच्या ट्रिटमेण्टसाठीही रीघ लागली आहे. उष्णतेमुळे कुत्र्यांची कातडी लाल होऊन अंगावरचे केस जाणं, अंगावर जखमा होणं याच्या घटनाही गेल्या अठवड्यात ३० ते ३५ टक्क्यांनी वाढल्याचं सुनिश म्हणाले.

पाळीव प्राणी आणि पक्ष्यांप्रमाणेच वनराई असलेल्या ठिकाणी आढळणाऱ्या पशुपक्ष्यांनाही उन्हाळ्याची झळ झेपेनाशी झाली आहे. यात खारुताई ते थेट जंगलातल्या सापांनाही या समस्येने ग्रासंलंय. जंगलातील साप वस्तीत येण्याचं प्रमाणही सध्या ४० ते ४५ टक्यांनी वाढलं असल्याचं मुलुंडचे सर्पमित्र संदीप मोरे यांनी सांगितलं.

दिवसागणिक वाढत चाललेल्या या प्राण्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी हॉस्पिटल्सची वाट प्राणीमित्रांनी धरली आहे. मात्र, हॉस्पिटल्समध्ये असलेल्या प्राण्यांच्या गदीर्मुळे तसंच पशुवैद्यकांच्या कमतरतेमुळे अनेक मुक्या प्राण्यांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत.

वाढत्या उष्म्याचा तडाखा गेल्या आठवड्यात परळमध्ये दोन गायींना बसला आणि त्यांनी जागीच प्राण सोडले. तर, ठाण्यात एक घोडा गतप्राण झाला. दिवसेंदिवस उष्म्याचं प्रमाण वाढत चाललंय आणि बाष्पीकरणामुळे पाण्याचे स्रोत आटत चाललेत. पाणवठे कोरडे पडू लागल्यानेही पशुपक्ष्यांना त्याचा फटका बसू लागला आहे.

प्राणीमित्रावर जीवघेणा हल्ला

28 Oct, 2007

- मुंबई टाइम्स टीम, ठाणे

वन्यजीवांसाठी अहोरात्र झटणाऱ्या प्लाण्ट अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर सोसायटीच्या प्राणीमित्रांवर शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात चौघे जखमी झाले आहेत, तर एकाला जबर मार बसला आहे. हे प्राणीमित्र खारेगाव इथे साप पकडण्यासाठी गेले असता ही घटना घडली.

प्लाण्ट अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर सोसायटीच्या सुनीश सुब्रमण्यम् यांना शुक्रवारी घरी साप आल्याचा, एक अनामिक फोन आला. संबंधित सापाला पकडून त्याला जंगलात परत सोडण्याच्या उद्देशाने क्षणाचाही विलंब न करता संस्थेचे प्राणीमित्र खारेगांव इथे साप पकडण्यासाठी पोहोचले. एका बास्केटमध्ये असलेल्या सापाला यांच्याकडे फोनवर सांगितल्याप्रमाणे हस्तांतरितही करण्यात आलं. पण, साप पकडून संस्थेच्या व्हॅनमध्ये बसल्यानंतर तिथे असलेल्या जमावाने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात व्हॅनवर दगडं फेकण्यात आली, बांबूने फटके मारण्यात आले. व्हॅनच्या काचा फुटल्याने आत बसलेल्या संस्थेच्या एकूण चार जणांना या प्रसंगाला सामोरं जावं लागलं. घडल्या प्रकरणात राम माखिजा या संस्थेतल्या कार्यर्कत्याला जबर मारहाण झाली. त्याला कळव्यातल्या शिवाजी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

कळवा पोलिस स्टेशनकडे या संदर्भात गुन्हा नोंदवला आहे. कचारू घाडगे, प्रसाद गायकवाड, ओमप्रकाश जैसवाल

आणि सावित्रीबाई जैसवाल यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे.

संस्थेच्या सुनिश यांना ज्या सर्पाबाबत सांगण्यात आलं तो सावित्रीबाई जैसवाल यांच्याकडून ताब्यात घेण्यात आला होता. त्यामुळे ही घटना ठरवून केली गेल्याचं प्लाण्ट अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर सोसायटीच्या सुनिश यांचं म्हणणं आहे. तर, पोलिसांच्या मते, ही घटना सावित्रीबाई जैसवाल यांच्या सांगण्यावरून झाली आहे. तिच्या सांगण्यावरून हा हल्ला करण्यासाठी या जमावाने दगडफेक केली गेली.