Tuesday, April 20, 2010
प्राणीमित्रावर जीवघेणा हल्ला
- मुंबई टाइम्स टीम, ठाणे
वन्यजीवांसाठी अहोरात्र झटणाऱ्या प्लाण्ट अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर सोसायटीच्या प्राणीमित्रांवर शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात चौघे जखमी झाले आहेत, तर एकाला जबर मार बसला आहे. हे प्राणीमित्र खारेगाव इथे साप पकडण्यासाठी गेले असता ही घटना घडली.
प्लाण्ट अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर सोसायटीच्या सुनीश सुब्रमण्यम् यांना शुक्रवारी घरी साप आल्याचा, एक अनामिक फोन आला. संबंधित सापाला पकडून त्याला जंगलात परत सोडण्याच्या उद्देशाने क्षणाचाही विलंब न करता संस्थेचे प्राणीमित्र खारेगांव इथे साप पकडण्यासाठी पोहोचले. एका बास्केटमध्ये असलेल्या सापाला यांच्याकडे फोनवर सांगितल्याप्रमाणे हस्तांतरितही करण्यात आलं. पण, साप पकडून संस्थेच्या व्हॅनमध्ये बसल्यानंतर तिथे असलेल्या जमावाने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात व्हॅनवर दगडं फेकण्यात आली, बांबूने फटके मारण्यात आले. व्हॅनच्या काचा फुटल्याने आत बसलेल्या संस्थेच्या एकूण चार जणांना या प्रसंगाला सामोरं जावं लागलं. घडल्या प्रकरणात राम माखिजा या संस्थेतल्या कार्यर्कत्याला जबर मारहाण झाली. त्याला कळव्यातल्या शिवाजी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
कळवा पोलिस स्टेशनकडे या संदर्भात गुन्हा नोंदवला आहे. कचारू घाडगे, प्रसाद गायकवाड, ओमप्रकाश जैसवाल
आणि सावित्रीबाई जैसवाल यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे.
संस्थेच्या सुनिश यांना ज्या सर्पाबाबत सांगण्यात आलं तो सावित्रीबाई जैसवाल यांच्याकडून ताब्यात घेण्यात आला होता. त्यामुळे ही घटना ठरवून केली गेल्याचं प्लाण्ट अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर सोसायटीच्या सुनिश यांचं म्हणणं आहे. तर, पोलिसांच्या मते, ही घटना सावित्रीबाई जैसवाल यांच्या सांगण्यावरून झाली आहे. तिच्या सांगण्यावरून हा हल्ला करण्यासाठी या जमावाने दगडफेक केली गेली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment