
28 Apr 2008
गेल्या आठवड्यापासून उन्हाचा पारा तेजीनं वाढतोय. १८ एप्रिलला या पा - यानं ३७ अंश सेल्सिअसवर पोहोचून हंगामाचा उच्चांक गाठला होता. या दिवसागणिक बदलांमुळे सर्वांच्याच अंगाची लाहीलाही होत असून त्याचा सर्वाधिक फटका मुक्या प्राण्यांनाही बसल्याचं चित्र सध्या मुंबई-ठाण्यात दिसू लागलंय. यामुळे प्राण्यांची हॉस्पिटलं तुडुंब भरल्याचं दृष्य असून हॉस्पिटलांत दाखल झालेल्या अनेक प्राण्यांना उन्हाचा तडाखा सहन न झाल्याने आपले प्राणही गमवावे लागल्याचं उघड झालंय.
गेल्या अठवड्यातल्या तापमानातील लाक्षणिक बदलांमुळे मुंबईच्या सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल्स (बॉम्बे एसपीसीए) या संस्थेकडे सुमारे ३० ते ४० पक्षी सध्या ट्रिटमेण्ट घेत असल्याचं संस्थेच्या जे सी खन्ना यांनी सांगितलं. यात आकाशात उंचच उंच घिरट्या घेणाऱ्या घारी, कबुतरं, पोपट, कावळे तसंच कोकीळ पक्षांचा समावेश आहे. याखेरीज, घोडे, गाई हेही दाखल झाल्याचं ते म्हणाले.
एसपीसीएच्या ठाणे शाखेतही दररोज सुमारे पाच ते दहा पक्षी दाखल होत असून यात पक्ष्यांचे पंख तुटणं, उंचावरून पडल्याने पक्षी जखमी होणं तसंच, इतर प्राण्यांच्या नाकातून रक्त येणं यासारख्या आजारांचं प्रमाण जास्त असल्याचं पशुवैद्यक डॉ. सुहास राणे म्हणाले.
भांडुपच्या प्लॅण्ट अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर सोसायटीकडे सुमारे ३० ते ४० पक्षी गेल्या आठवड्यात ट्रीटमेण्टसाठी आले होते, असं संस्थचे सुनिश सुब्रमण्यम यांनी सांगितलं. यात घारी, घुबडं, कबुतरं यांच प्रमाण जास्त आहे. संस्थेकडे कुत्र्यांच्या ट्रिटमेण्टसाठीही रीघ लागली आहे. उष्णतेमुळे कुत्र्यांची कातडी लाल होऊन अंगावरचे केस जाणं, अंगावर जखमा होणं याच्या घटनाही गेल्या अठवड्यात ३० ते ३५ टक्क्यांनी वाढल्याचं सुनिश म्हणाले.
पाळीव प्राणी आणि पक्ष्यांप्रमाणेच वनराई असलेल्या ठिकाणी आढळणाऱ्या पशुपक्ष्यांनाही उन्हाळ्याची झळ झेपेनाशी झाली आहे. यात खारुताई ते थेट जंगलातल्या सापांनाही या समस्येने ग्रासंलंय. जंगलातील साप वस्तीत येण्याचं प्रमाणही सध्या ४० ते ४५ टक्यांनी वाढलं असल्याचं मुलुंडचे सर्पमित्र संदीप मोरे यांनी सांगितलं.
दिवसागणिक वाढत चाललेल्या या प्राण्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी हॉस्पिटल्सची वाट प्राणीमित्रांनी धरली आहे. मात्र, हॉस्पिटल्समध्ये असलेल्या प्राण्यांच्या गदीर्मुळे तसंच पशुवैद्यकांच्या कमतरतेमुळे अनेक मुक्या प्राण्यांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत.
वाढत्या उष्म्याचा तडाखा गेल्या आठवड्यात परळमध्ये दोन गायींना बसला आणि त्यांनी जागीच प्राण सोडले. तर, ठाण्यात एक घोडा गतप्राण झाला. दिवसेंदिवस उष्म्याचं प्रमाण वाढत चाललंय आणि बाष्पीकरणामुळे पाण्याचे स्रोत आटत चाललेत. पाणवठे कोरडे पडू लागल्यानेही पशुपक्ष्यांना त्याचा फटका बसू लागला आहे.
No comments:
Post a Comment